राज्यात गेल्या महिन्या दोन महिन्यांत राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानिमित्त आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन परिसरात येथे महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांच्या वतीने कोरडवाहू शेतीसाठी एकरी ७५ हजार व बागायती शेतीसाठी एकरी १.५० लाख मदत मिळावी यासाठी मागणी करण्यात आली. तसेच इतर विविध मागण्यांसाठी यावेळी घोषणा देऊन सरकारला राज्यातील समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत लोटला गेला आहे. त्याला सर्वस्वी अवैध्यरित्या राज्याच्या सत्तेवर बसलेले शिंदे – फडणवीस सरकार कारणीभूत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून मंत्रिमंडळाचा विस्तारच न केल्यामुळे अनेक खात्यांना मंत्री तसेच जिल्ह्यांना पालकमंत्री भेटलेले नाहीत अशा परिस्थितीत दिवसेंदिवस समस्या बिकट बनत गेल्या आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पण त्यांचे अजूनही पंचनामे होऊ शकले नाहीत. तरी नवनिर्वाचित सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी

