महाराष्ट्राला सावरतेय शिवभोजन थाळी. शिवभोजन थाळीचा घास मिटवतोय गोरगरीबांचा उपास कोरोना काळात शिवभोजन थाळीचा सर्वसामान्यांना आधार.
shivbhojan thali images shivbhojan thali
वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे अनेक गोरगरीब लोकांचे रोजगार बंद झाले. हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. रोजगाराविना अन्न मिळायचे कसे हा पोटापाण्याचा प्रश्न कठोर होत चाललेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने चालू केलेली शिवभोजन थाळी या योजनेने खऱ्या अर्थाने दिलासा दिला.
२६ जानेवारी २०२० या दिवसापासून आपल्या राज्य सरकारने हा स्तुत्य उपक्रम चालू केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुग्णालय, बस स्थानक, रेल्वे परिसर, महानगरपालिका परिसरात एक एक भोजनालय सुरू झाले. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी १० रुपयात शिवभोजन योजनेची सुरुवात झाली. पुढे कोरोनाचा महाराष्ट्रात उद्रेक झाल्यावर अनेकांचे रोजगार गेले. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ती थाळी ५ रूपयाला केली. सध्याचं कोरोनाचं दुसरं रुप अजून भयंकर झालेलं आहे. सध्या राज्यात कडक निर्बंध चालू आहेत. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराला जाता येत नाही. कष्टकरी, शेतकरी, मजूर, असंघटित कामगार, विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी मोफत चालू केली आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार यांचं हे काम अभिनंदनीय आहे. अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटावा असं काम आहे.
सुरुवातीला जिल्हा स्तरावर राबवली जाणारी ही योजना आता तालुकास्तरावर विस्तारली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तब्बल ३ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. ज्याप्रमाणे महाराजांनी सर्वांस पोटास लावले त्याच्या शब्दशः अर्थाने म्हणाल तर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सुलभ केला आहे.
शेवटी काय थाळ्या वाजवून कोरोना जाईल या केंद्र सरकारच्या अंधश्रद्धेला न भुलता महाविकास आघाडी सरकारने त्याच थाळीत गरजूंना अन्न दिले आहे.